नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक तातडीचं पत्र महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला लिहिलं असून त्यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विमान प्रवाशांबाबत राज्य सरकारच्या गाइडलाइन्सवर आक्षेप घेत केंद्र आणि राज्याच्या गाइडलाइन्समध्ये समानता आणण्याची स्पष्ट सूचनाच केंद्राकडून करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना तातडीचे पत्र लिहिले असून त्यात राज्याने विमान प्रवाशांबाबात आखलेल्या नियमावलीवर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबंकल्याण मंत्रालयाने ज्या गाइडलाइन्स ठरवल्या आहेत त्याच गाइडलाइन्स राज्यस्तरावर अमलात आणाव्या. तसा बदल आपण तातडीने करावा व नव्याने गाइडलाइन्स जाहीर करण्यात याव्यात. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे. भूषण यांनी यात मुंबई विमानतळासाठी विशेष सूचना केल्या आहेत.
‘या’ आहेत सूचना
१. विदेशातून मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात यावी. तो कोणत्याही देशातून आला असला तरी चाचणी बंधनकारक असेल.
२. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १४ दिवसांचे सक्तीचे होमक्वारंटाइन असेल. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असली तरीही क्वारंटाइन राहावं लागेल.
३. मुंबईहून पुढे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरच विमानतळ सोडू दिले जावे.
४. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाकडे किमान ४८ तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल हवा.
















