चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव नगरपरिषद, जि. जळगाव यांच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी जलद, पारदर्शक व प्रभावीपणे सोडविण्यासाठी ‘तक्रार निवारण (Takrar Nivaran)’ हे मोबाईल अँप सुरू करण्यात आले आहे. सदर अँप चे लोकार्पण सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण, लोकनियुक्त नगराध्यक्षा, चाळीसगाव नगरपरिषद यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
हे मोबाईल अँप मुख्याधिकारी मा. श्री. सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत ठाकूर नगरअभियंता विद्युत यांनी विकसित करणे करिता मेहनत घेतली आहे. प्रशासन व तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या अँप च्या माध्यमातून नागरिक आता घरबसल्या आपल्या समस्या थेट नगरपरिषदेकडे नोंदवू शकणार आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, बांधकाम आदी विभागांशी संबंधित तक्रारी या अँप द्वारे नोंदविता येतील. नोंदविलेली तक्रार थेट संबंधित विभाग प्रमुखांकडे पाठविली जाईल व त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल.
तक्रारीची सद्यस्थिती नागरिकांना Real-time tracking द्वारे पाहता येणार असून, निवारण झाल्यानंतर मोबाईलवर सूचना देखील मिळणार आहे. नागरिकांनी Google Play Store वरून “Takrar Nivaran – Chalisgaon NP” हे अँप डाउनलोड करून, प्रथम मोवाईल नंबरद्वारे नोंदणी करावी. ओटीपीद्वारे खात्री झाल्यानंतर तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. तक्रारीसोबत फोटो अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
या उपक्रमामुळे कागदावरील तक्रार प्रणाली कमी होऊन पेपरलेस, जलद आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांनी या अँपचा जास्तीत जास्त वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण नगराध्यक्षा व चाळीसगाव नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. यावेळी पालिकेचे श्री. सौरभ जोशी मुख्याधिकारी, बाळु पारधी उपमुख्याधिकारी, श्री. प्रशांत ठाकूर विद्युत अभियंता, श्री. देवेंद्र शिंदे बांधकाम अभियंता, श्री. राजीव जाधव पा.पू. अभियंता, श्री. स्वप्निल कुमावत नगररचना सहा., विजय जाधव स्वच्छता निरीक्षक, व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















