जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित कथा- कथन या कार्यक्रमाचे आयोजन भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आलं होतं.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार ऐश्वर्या परदेशी यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर अनुभूती इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी कृष्णा क्षीरसागर, आयुष बारी, वीर भंडारी, आमलान रथ, समीक्षा पवार, अनुभूती चौधरी, देवबोध हलदेकर, यांच्या तबलावादनाने झाली. त्यांच्यासोबत त्यांचे गुरु श्री शांडिल्य हे पढंत साठी होते. त्याचबरोबर नगमाची साथ अनुभूती स्कूलचेच शिक्षक भूषण खैरनार यांनी केली. या कार्यक्रमानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले त्यावेळी प्रमुख उपस्थिती सौ ज्योती भाभी जैन, सपना काबरा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर तसेच जळगावच्या गुरु डॉ. अपर्णा भट आणि आजच्या कार्यक्रमाची मुख्य कलाकार निधी प्रभू यांच्या हस्ते झाले. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचा
सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याचप्रमाणे निधी प्रभूला साथ संगत करणाऱ्या कलावंतांचा सत्कार अनुक्रमे प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. शरदचंद्र छापेकर सचिव अरविंद देशपांडे व गुरुवर्य प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला. आणि सुरू झाला कथाकथक चा सुरेल व नादमय प्रवास या प्रवासात दिलासा सांगत तबल्यावर रोहित देव, संवादिनी व गायनासाठी अजिंक्य पोणशे तर बासरीवर निरंजन भालेराव यांनी साथ संगत केली.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि नृत्य-संगीताची समृद्ध परंपरा अनुभवण्याच्या उद्देशाने “नाद निधी” दौऱ्याची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या “सुंदर ते ध्यान” या अभंगाने करण्यात आली. या सादरीकरणामध्ये वारकरी भक्त माऊलींचे प्रथम दर्शन घेत असतानाचा अनुभव नृत्यातून प्रभावीपणे साकार करण्यात आला.
नृत्यांगना निधी हिने “नाद निधी” या सांगीतिक दौऱ्याबाबत सविस्तर माहिती देत निधीने वीर रस युक्त ताल धमार तालाने कार्यक्रमाची दमदार तालांगाची केली. निधीने आपल्या दादा गुरु नटराज पं. गोपीकृष्णजी यांच्या बंधिशी सादर केले. यानंतर नाट्यसंगीताच्या सुरेल मेळाव्यात “श्रीरंग कमला कांता”, “घेई छंद”, “मुरलीधर श्याम” यांसारख्या अप्रतिम रचनांवर नृत्याविष्कार सादर करण्यात आला. तत्पूर्वी, तीनतालाच्या विविध बंधिशींमध्ये वारकरी तिहाई, तीश्र जाती आणि मिश्र जती,तालमणी पं. मुकुंदराज देव यांच्या बंधिशी अशा विविध रचनांचा समावेश होता, ज्यामुळे रसिक प्रेक्षकांना एक आगळीवेगळी अनुभूती मिळाली.
कार्यक्रमाची सांगता निधीने स्वतः बसवलेल्या एका रामभक्ताच्या आध्यात्मिक प्रवासाच्या कहाणीने केली. आधुनिकतेला आध्यात्मिकतेची जोड देत रामगुणगानाचे हे सादरीकरण एका वेगळ्या शैलीत सादर करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण प्रेक्षकवर्ग भावूक आणि मंत्रमुग्ध झाला.