चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मामलदे येथे एकीकडे लग्नाची धामधूम असताना दुसरीकडे २७ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणाचा पाण्याची मोटर लावत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे.
मामलदे (ता. चोपडा) येथील सुनील पाटील यांचे मोठे बंधू सतीश पाटील यांचा मुलगा महेंद्र पाटील याचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. शनिवारी (ता. २३) मामलदे येथे महेंद्र याचा हळदीचा कार्यक्रम होता लग्न घरात पाहुणे मंडळींची वर्दळ होती. यावेळी बंगलोर येथे नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर असलेला अमोल पाटील हा ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरून काम करीत होता. यावेळी अमोल सकाळी पाण्याची मोटर लावत असताना त्यास जोरात विजेचा धक्का बसला. यावेळी तो मागे फेकला जाऊन डोक्यावर पडला. डोक्यास जबर दुखापत होऊन अमोलचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावाच्या लग्नापूर्वीच चुलत भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत अमोलच्या पश्चात वडील, आई, बहिण, लहान भाऊ असा परिवार आहे.
शेती विकून शिक्षण दिले
आयटी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला अमोल पाटील हा अतिशय मितभाषी व हुशार असल्याने त्याच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी काही शेती विकून अमोलचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याची जाण ठेवत अमोलने ही आयटीत शिक्षण पूर्ण केले. बंगलोर येथे एका नामांकित कंपनीत नोकरीला सुरुवात केली होती. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरून काम सुरू होते. यातच आई वडिलांना कामात मदत करणारा अमोलवर आज काळाने घाला घातला.