खामगाव (वृत्तसंस्था) पैशाच्या व्यवहारातून दोन गटांत शस्त्रांनी तुफान हाणामारी झाली. एवढेच नव्हे तर, गावठी कट्ट्यातून झाडण्यात आलेली गोळी हनवटीत घुसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एका वृद्ध महिलेसह अन्य दोनजण गंभीर जखमी झाले. गुरुवार, ७ डिसेंबर रोजी दुपारी खामगाव तालुक्यातील रोहनानजीक असलेल्या निमकवळा फाट्यावर ही खळबळजनक घटना घडली.
नेमकं काय घडलं ?
खामगाव-बुलढाणा रस्त्यावर असलेल्या रोहना बांधव पाल टाकून वास्तव्य करतात. दरम्यान, गुरुवार, ७ नोव्हेंबरच्या दुपारी त्यांच्याकडे पेनसांगवी (ता. चिखली) येथील त्यांच्याच समाजाचे काही लोक पाहुणे म्हणून गेले होते. पैशाच्या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने दोन्ही गटांतील लोकांनी लाठ्या-काठ्या तसेच धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला, तर एकाने गावठी कट्टयातून धाडधाड गोळ्या झाडल्या.
एकाचा जागीच मृत्यू !
या हल्ल्यात राजेंद्र सोनू भोसले याच्या हनवटीजवळ बंदुकीची गोळी लागल्याने तसेच पोटावर चाकूचे वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर शांताबाई प्रकाश पवार यांच्या पायालादेखील गोळी लागली असून त्यांच्यासह विलास प्रकाश पवार हे गंभीर झाले. दोन्ही जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या तणावपूर्ण शांतता !
घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस व बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाच-सहा आरोपींना ताब्यात घेत शांततेचे आवाहन केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती