जळगाव (प्रतिनिधी) जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे हा डॉ. सुनिल नेवे यांनी लिहिलेला ग्रंथ प्राप्त झाला. पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तीमत्व, आपले समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यासह आपल्या व्यापक सेवाकार्य यांचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास सुयश चिंतितो, असा अभिप्राय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी त्यांचे आत्मचरित्रावर आधारित ‘जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाची प्रत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अवलोकनार्थ पाठवली होती. कोश्यारी यांनी या पुस्तकावर तातडीने आपला अभिप्राय लिहून पाठवला आहे. लेखक डॉ. सुनिल नेवे यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करुन लिहिलेला हा ग्रंथ संग्रहणीय झाला आहे. त्याबद्दल त्यांचेदेखील मी अभिनंदन करतो, असे देखील राज्यपाल म्हणाले आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या १२ नावांमध्ये खडसे यांचे देखील नाव आहे. तशात राज्यपालांनी खडसे यांना पुस्तकाच्या निमित्ताने शुभेच्छा पाठवल्यामुळे अनेकांच्या आश्चर्याचा धक्का बसला आहे.