पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झालेला असून पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत राजीव सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी २२ एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईहून लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला पुण्याला बोलवण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून २०१४ साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.