कोल्हापूर (वृत्तसंस्था) सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यावेळी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मला आधीच सांगण्यात आल्याने मी वाचलो असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी सभागृहात म्हटलं, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक झाली. त्यावेळी एका प्रकरणात मला गोवण्यात आलं. त्या दरम्यान मला पोलीस आणि प्रशासनाचा आलेला अनुभव थक्क करणारा आहे. या सभागृहाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांकडे मला माहिती द्यायची आहे की, कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला उपचारासाठी दाखल केलं होतं. अचानक डॉक्टर माझ्याकडे आले आणि आग्रह करु लागले की, नितेशजी तुमची अँजिओ करण्याची गरज आहे. मी म्हटलं मला तसं तरी वाटत नाही. तर मला सांगितलं की, नाही तुम्हाला सीटी अँजिओ करण्यास सांगितलं आहे.
मारुन टाकण्याचा प्लॅन
रुग्णालयातील काही लोक आमच्याही ओळखीचे आहेत. एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितलं की, साहेब हे सीटी अँजिओ करु नका, त्या निमित्ताने एक इंक शरीरात टाकण्यात येते आणि त्यानिमित्ताने तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. नितेशजी कुठल्याही परिस्थितीत होकार देऊ नका. हा प्रकार माझ्यासोबत कोल्हापुरातील रुग्णालयात झाला आहे असंही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी पुढे म्हटलं, माझी शुगर लेवल लो दाखवत होती, तरीही रात्री अडिच वाजता 200 पोलीस मला डिस्चार्ज करण्यासाठी पाठवले होते. आत्ताच्या आता डिस्चार्ज करा आणि जेलमध्ये पाठवा. पोलिसांनी रात्री आल्यावर पाहिलं की, या पेशंटची अवस्था खरंच खराब आहे तेव्हा पोलीस बाहेर गेले.
कायमस्वरुपी विषय संपवून टाकायचं याला म्हणतात ठाकरे सरकार
ईसीजी मशिनमध्ये खोटा रिपोर्ट आणण्यासाठी मी तर बोट टाकू शकत नाही ना? पण तरीही वारंवार पोलिसांवर प्रेशर येत होता, वारंवार कलानगर परिसरातून फोन येत होते की, याला डिस्चार्ज करा, अटक करायची आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सभागृहात यायलाच नको, जिवंत ठेवायचं नाही असे प्रकार राज्यात सुरू आहेत. फक्त षडयंत्र रचायचं नाही तर त्यांच्या शरीरात चुकीची औषधं टाकायची आणि कायमस्वरुपी विषय संपवून टाकायचं याला म्हणतात ठाकरे सरकार… असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.