धरणगाव (प्रतिनिधी) आज सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तितक्यात प्रमाणात ग्राहकांची फसवणूक सुद्धा होत आहे, समाजामध्ये ग्राहक जाणीव, जनजागृती निर्माण होण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवून ग्राहक साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी धरणगाव तहसील कार्यालयात झालेल्या ग्राहक दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात केले.
अध्यक्षस्थानी तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी रेवना कांबळे ह्या होत्या तर मंचावर पुरवठा अधिकारी किशोर मोरे, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, तालुका अध्यक्ष विनायक महाजन हे उपस्थित होते.
डॉ. सोनवणे यांनी आपल्या व्याख्यानात ग्राहक पंचायतीचे महत्त्व, ग्राहक दिनाचे महत्त्व आणि ग्राहकांची जबाबदारी याविषयी माहिती विविध उदाहरणाद्वारे विशद करून ग्राहकांना सजग राहण्याचे आवाहन केले. यावेळी दिनेश तायडे, विनायक महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात पुरवठा निरीक्षण अधिकारी रेवना कांबळे यांनी ग्राहक पंचायतीचे महत्त्व सांगून ही चळवळ ग्रामीण भागात नेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू ओस्तवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरवठा अधिकारी रितेश पवार यांनी केले. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघाचे अध्यक्ष जी.डी. पाटील, आबा वाघ, अनिल गुप्ता, अरविंद ओस्तवाल यांच्यासह ग्राहक, दुकानदार आणि तहसील कर्मचारी उपस्थित होते.
















