चाळीसगाव (प्रतिनिधी) मतदार यादी पडताळणीचे काम करत असताना काहींनी येऊन पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादाखक घटना घडली आहे. सुदैवाने ट्रिगर दाबूनही गोळी न सुटल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शहरातील घाट रोड परिसरात फिर्यादी जय चौधरी, निखील पवार, विष्णू चौधरी हे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्या सूचनेने या परिसरात मतदार यादी पडताळीचे काम करत होते. या वेळी किरण घोरपडे हा त्याच्या दोन साथीदारांसह आला अन् तुम्ही येथे काय करत आहात?, असे त्याने विचारले. दरम्यान, मतदार यादी पडताळणीचे काम करत असल्याचे सांगूनही किरण घोडपडे याने शिवीगाळ करत त्यांना लाथबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी फिर्यादी जय चौधरी याने सोमनाथ चौधरी यांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर त्यांनी किरण घोरपडे यास जाब विचारला. त्याचवेळी किरण घोरपडे याने खिशातून पिस्तूल काढत सोमनाथ चौधरी यांच्या दिशेने ताणून शिवीगाळ करत डायरेक्ट फायरिंग करुन मारुन टाकेन असे, बोलून जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तलचे स्ट्रिगर ओढला. परंतु सुदैवाने फक्त कट असा आवाज येऊन त्यातून फायरिंग झाली नाही. त्यानंतर यावेळी झालेल्या झटापटीदरम्यान त्याची पिस्तूल खाली पडली. तर यानंतर किरण घोरपडे व त्याचे साथीदार हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. त्यांनतर जय चौधरी यांनी ही पिस्तूल पोलीस ठाण्यात जमा करुन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांकडून संशयित आरोपींचा तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.