भंडारा (वृत्तसंस्था) घरातील विजेच्या वस्तू अनेकदा मृत्यूचे कारण बनतात. सध्या असेच एक प्रकरण भंडारा येथून समोर आले आहे. या घटनेत फरशी साफ करताना कुलरचा धक्का लागून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव इथं घडली आहे. सुचिता धनपाल चौधरी (वय २२, रा. पाहुणगाव) असं मृत तरुणीचं नाव आहे. ती सकाळी आपल्या घरात साफसफाईचं काम करीत होती. घरात लावलेल्या कुलरजवळची जागा स्वच्छ करत असताना तिचा स्पर्श कुलरला झाला. मात्र, या कुलरमध्ये वीज प्रवाहित असल्याने विजेचा जबर धक्का लागून ती कोसळली आणि बेशुद्ध पडली.
सुचिता कोसळताच घरात एकच हलकल्लोळ झाला. लागलीच तिला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.