जळगाव (प्रतिनिधी) कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अनेकांच्या अंगाला स्टीलची भांडी, नाणी, लोखंड, लाकूड, प्लास्टिक चिटकत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या अफवांवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष अंगाला भांडी चिकटण्याचा प्रकार फोल ठरला आहे. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मराठी विज्ञान परिषद यांनी त्यामागील विज्ञान सांगून सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला.
कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व आलं असा दावा नाशिकच्या एका ज्येष्ठ नागरिकांनी केला होता. हा दावा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून फोल ठरवला. त्यामागची चिकित्सा केली आणि शरीरात लस घेतल्यानंतर चुंबकत्व तयार होत नाही हेच सिद्ध केले.
जळगाव शाखेच्या अंनिस व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात मॅग्नेट मॅनचा फोलपणा सिद्ध करण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे व मराठी विज्ञान परिषदेचे सचीव दिलीप भारंबे यांनी सप्रयोगाने सिद्ध केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते. येथे अंगाला नाणी, चमचे कसे चिकटतात याचा प्रयोग करून ते कोणत्या कारणाने चिकटतात हे सिद्ध केले.
चुंबकत्व सिद्धांत दावा फोल कसा ठरवता येतो?
प्रथम जी लस घेतली जाते ती ०.५ मिली असते. त्यात लोखंडाला आकर्षण करणारा फेरोमॅग्नेट यासारखे कण नसतात. म्हणजे लोखंडाला आकर्षण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मॅग्नेट मॅनने स्टेनलेस स्टीलचे चमचे, नाणी, ताट, वाटी यासारखे पदार्थ चिकटवले होते. पण लाकूड, प्लास्टिक यासारखे पदार्थ देखील चिकटतात. या पदार्थांमध्ये लोखंड नसते तरीही ते चिकटतात. चुंबक फक्त लोखंडाला आकर्षित करतो हे आपण विज्ञानात शिकलो.
जर शरीरात चुंबकत्व असेल तर ते आपल्याला सहज सिद्ध करता येते. प्रयोगशाळेत चुंबकसूची असते, ती नेहमीच उत्तर दक्षिण दिशेला स्थिर असते. तिला चुंबकाजवळ नेल्यास ती हलते. मग आपण ही चुंबकसूची त्या दावा करणाऱ्या मॅग्नेट मॅनजवळ नेल्यास हा दावा तपासता येईल. त्या व्यक्तीचे अंग गुळगुळीत असावे, रबरासारखे मऊ असावे, केस नसावे, अशा व्यक्ती हा प्रयोग सहज करू शकतात. आपल्या शरीरातून त्वचेतून घाम श्रवतो, त्यात सिबम नावाचे तेलकट, घामट द्राव श्रवतो. या द्रवातील रेणूंचा विषम पदार्थाशी संपर्क आल्यास विषम आकर्षण या वैज्ञानिक नियमानुसार हे दोन्ही विषम पदार्थ आकर्षिले जातात व बाहेरील पदार्थ घट्ट बसतो. एक बंध तयार होऊन घर्षणामुळे अंगाला चिकटून राहतात.