पुणे (वृत्तसंस्था) जानेवारीपासून दर महिन्याला कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लशीच्या दहा कोटी मात्रा (डोस) तयार करण्यात येणार असून लस सर्वात आधी भारतीयांनाच देण्यात येईल, त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच आफ्रिकेतील देशांमध्ये लसीचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती आदर पुनावाला यांनी दिली आहे.
येत्या दोन आठवड्यांत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सीरम इन्स्टिटय़ूटला भेट देऊन लस निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यानंतर पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत लशीच्या निर्मितीबाबत माहिती दिली. पूनावाला म्हणाले, ‘‘सीरम सध्या दर महिन्याला लशीच्या ५ ते ६ कोटी मात्रा तयार करत आहे, जानेवारीपासून ही प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि प्रतिमहिना दहा कोटी मात्रा तयार केल्या जातील.’’ मात्र, या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.
कोरोना लसीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याचं सर्वात आधी वितरण भारतात करण्यात येईल. त्यानंतर आशिया खंडात या लसीचं वितरण करण्यात येणार आहे. आमच्याकडे कोरोना लसीच्या वितरणाचा प्लॅनही तयार आहे. येत्या जुलै २०२१ पर्यंत ३० कोटी लसींच्या निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाची लस तयार झाल्यावर त्याची घोषणा आरोग्य मंत्रालायकडूनच केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. लसीच्या किमतीवर चर्चा नाही.