धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापाऱ्याची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवत चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरी परत जात असतांना घडली घटना
याबाबत दिलीप राजु चौधरी (वय-३२ वर्ष, व्यवसाय कापसाचे व्यापार, रा. मु.पो. फरकांडे ता. एरडोल) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते कापसाचे व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी (रा. फरकांडे ता. एरंडोल) यांच्याकडे सुमारे १० वर्षापासून कापसाची रेडिंग करणे, खरेदी करणे, गाड़ी लोड करून तो कापुरा बाजारात जिनींगमध्ये घेवुन जाण्याचे काम पाहतो. दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी नांदखुर्दे ता. एरंडोल व ढेकु ता. अमळनेर येथून सुमारे १०० क्विंटल प्रत्येकी दोन गाड्या भरून हकिम एजन्ट मार्फतीने बालाजी जीनिंग येथे आले होते. दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारा मालक स्वप्नील याने मला जळगाव जायचे आहे असे सागितले. तेव्हा मी कासोदयावरून फरकांडे येथे स्वप्नीलच्या घरी गेलो तेथून मालकाची होंडा सिटी गाडी (क्र. MH-01-AL-7127) घेवून कासोदा येथे आलो व तेथुन मालकाला घेवून जळगाव येथे पैसे आणण्याकामी निघालो होतो. त्यावेळी आमचे मालक स्वप्नील जवळ काट्यावर काम करणारा मुलगा दादू धोबी याचा मोबाईल होता व ते त्या मोबाईलवरून बोलताना माझ्या गाडीत बसले. त्यावेळीस मालक मोबाईलवर मालक जळगाव येई पावेतो कोणाशी तरी बोलत होते.
हवालामार्फत आलेले १० से ११ लाख रुपये होते सोबत
जळगाव मधील तीरुपपी व बालाजी अश्या दोन बिल्डिंगमध्ये गेलो. तेथे हवालामार्फत आलेले वरील नमुद कापसाचा ट्रकचे १० से ११ लाख रुपये स्वप्नील सोबत आणलेल्या बॅगमध्ये घेवून कासोदा येथे जाण्यासाठी निघालो. त्यावेळी जळगावमधील डॉ. राजेश डाबी यांच्या मेडिकलवरून मालकांनी त्यांच्या वडीलांसाठी काही औषधी घेतले व तेथून घरी येण्यासाठी निघालो. तेव्हा मालक स्वप्निल स्वतः गाडी चालवीत होते. मी बाजूच्या सीटवर बसलेला होतो व पैशांची बॅग माझ्या पायाजवळ ठेवलेली होती. आम्ही सायंकाळी ०७.३० वा. सुमारास पाळधी गावाच्या पुढे साईबाबा मंदिराच्या गेट समोर आलो. त्यावेळी आमच्या गाडी मागून एक होंडा युनिकन मोटारसायकलवर दोन लोक येऊन त्यांनी मोटर सायकल आमची गाडीला आडवी लावून आमची होंडा सिटी गाडी थांबवली. त्यानंतर दोन इसमापैकी जो मोटारसायकल चालवित होता. त्याच्या अंगात पांढरा रंगाचे शर्ट होते. काळसर रंगाची पॅण्ट घातलेली होती तो शरीराने मजबूत व कपाळावर टीका लावलेला होता. तो अंदाजे ३५ ते ३८ वयाचा इसम होता. त्याचे सोबत असलेल्या इसमाचे अंगात काळसर रंगाचे शर्ट होते शरीराने मध्यम व अंदाजे ३० ते ३५ वयाचा इसम होता.
साईबाबा मंदिराच्या गेट समोर बहाण्याने गाडी अडवली
सदर दोन्ही इसमांनी मालक स्वप्नील जवळ येऊन मालकाला सांगितले की, तुम्ही मागे एका गाडीवाल्याला कट मारून पुढे निघून आले, असे म्हणून सदर इसम मालकाला शिवीगाळ करून गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हा दुसरी मोटारसायकल आमची गाडी मागुन आली. तिच्यावर देखील दोन इसम होते. त्यापैकी एकाने अंगात लाईट ब्ल्यू कलरची जीन्स पॅन्ट घातलेली व शरीराने सरपातळ होता. तर दुसरा हा आमच्या गाडीचे मागील सीटवर बसून आम्हाला बोलला की, चला यांना पाळधी पोलीस स्टेशनला घ्या असे बोलत होता. त्यांच्यासोबत असलेल्या ब्ल्यू जीन्स पॅन्ट घातलेल्या इसमाने मालक स्वप्निलला दोन चापटा कानात मारल्या. तेव्हा त्याच्या हातात मी चाकू बघितला व मी गाडी खाली उतरून गेलो. तेव्हा गाडीमध्ये मागे बसलेला इसम देखील गाडीतून बाहेर निघाला व मला दमदाटी करू लागला. तेव्हा मालक स्वप्नीलचा जोरात आवाज आला त्यामुळे मी घाबरून मालकाला सांगितले की, त्यांना बॅक देऊन दे.
अशी झाली झटापट
तेव्हा मालक स्वप्निल गाडीचा ड्रायव्हर सीट कडील दरवाजा उघडून पैशांची बॅग घेऊन बाहेर येऊन रस्त्याचे कडेच असलेल्या ब्रासमध्ये (खड्यात) पडला. तेव्हा आम्हाला अडविणारे इसमापैकी ब्लू जीन्स पॅन्ट घातलेला इसम हा मालकाकडे हातातील पैशांची बॅग हिसकावून लागला. तेव्हा मी व मालक स्वप्नील आरडाओरड करू लागलो. त्यावेळी रस्त्यातील लोकांनी आम्हाला पाहून आरडाओरड केली व लोकांना पाहून सदरचे चारही जण त्यांच्या मोटार सायकलने पाळधीकडून पळून गेले. मी व मालक जखमी अवस्थेत एरंडोल रस्त्याकडे धावू लागले. तेव्हा काही अंतरावर मालक स्वप्नील रोडवर पडला. म्हणून मी स्वप्नीलजवळ जाऊन बघितले असता स्वप्नीलची पॅन्ट रक्ताने भरलेली होती. अंगावरील शर्ट फाटलेला होता व शर्टवर रक्त लागलेले होते. परंतू पैशांची बॅग मालकाच्या हातातच होती.
प्रतापराव पाटील यांना फोन करून सांगितला घटनाक्रम
यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गर्दी झाली. तेव्हा मी प्रतापराव पाटील यांना फोन करून सांगितले की, माझे मित्रास चाकु मारलेला आहे. अॅम्बुलन्स लवकर पाठवा. थोड्याच वेळात आमच्याजवळ अॅम्बुलन्स आली. तेव्हा मी आणि आजुबाजूच्या लोकांनी मालक स्वप्नीलला अॅम्बुलन्समध्ये टाकले व तेथुन ऑर्किड हॉस्पिटल जळगाव येथे आलो. तेथे डॉक्टरांनी मालकाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यास सांगितले. तेव्हा मी त्याच अॅम्बुलन्सने मालकाला सिव्हील हॉस्पीटलमध्ये नेले. तेथे डक्टरांनी मालकाला तपासले व मालक मयत झाले असल्याचे तोंडी सांगितले. याप्रकरणी चार अज्ञात लोकांविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.