छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भरधाव कारने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीस उडवल्याने पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजी नगर- सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावर फुलंब्री तालुक्यातील वाघलगाव फाटा येथे शनिवारी (दि.१६) रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. गंगुबाई जनार्दन मानकर (४५) असे या अपघातातील मृताचे नाव असून जनार्धन एकनाथ मानकर (५५) हे जखमी झाले आहेत.
मानकर दाम्पत्य हे वाघलगाव (ता. फुलंब्री) येथील रहिवासी आहे. ते दुचाकीवरुन (एमएच २० एआर ४९) फुलंब्रीकडून आपल्या गावाकडे निघाले होते. छत्रपती संभाजीनगर- सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावर वाघलगाव फाटा येथे वळण्यासाठी ते थांबले होते. यावेळी सिल्लोडकडून येणाऱ्या भरधाव चारचाकीने (एमएच २० डीजे ८६१८) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की दुचाकी महामार्गावरून किमान ३० फूट दूर जाऊन आदळली. दरम्यान अपघाताची माहिती कळताच रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी या जखमी मानकर दाम्पत्यास फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी गंगुबाई यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.