
धुळे (प्रतिनिधी) – कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेत धुळे येथील एका उच्चदाब वीजग्राहकाने केवळ १० लाख ७७ हजार ५७४ रुपये भरून तब्बल २३ लाख ८३ हजार ६४० रुपयांची सवलत मिळवली आहे. त्यामुळे ३४ लाख ६१ हजार २१४ रुपयांची थकबाकी अवघ्या १०.७८ लाख रुपयांत निकाली निघाली.
धुळे शहरातील सिद्धी डीहायड्रेशन प्रा. लि. हे महावितरणचे उच्चदाब वीजग्राहक आहेत. त्यांच्याकडे वीजबिलाची एकूण ३४ लाख ६१ हजार २१४ रुपयांची थकबाकी होती. थकबाकीमुळे २०१५ मध्ये त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. काही कारणांमुळे त्यांना थकीत वीजबिलाचा भरणा करता आला नव्हता.
दरम्यान, महावितरणच्या अभय योजनेची माहिती धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय सरग आणि व्यवस्थापक (वित्त व लेखा) अक्षय पाडसवान यांनी या कंपनीचे संचालक जितेंद्र कापडणेकर यांना दिली. योजनेचे फायदे समजावून सांगितल्यानंतर त्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी १० लाख ७७ हजार ५७४ रुपयांची मूळ थकबाकी एकरकमी भरली.
या योजनेअंतर्गत त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकार माफी, तसेच मूळ थकबाकीमध्ये १० टक्के सवलत मिळाली. यातून त्यांना एकूण २३ लाख ८३ हजार ६४० रुपयांचा आर्थिक लाभ झाला. या योजनेमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे सांगत कापडणेकर यांनी महावितरणचे आभार मानले. या उल्लेखनीय प्रतिसादाबद्दल अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक (वित्त व लेखा) अक्षय पाडसवान आणि सहाय्यक लेखापाल दिनेश मेटकर उपस्थित होते.
कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे आणि जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे मंडलाने ही कामगिरी केली. मंडलातील सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी अभय योजनेचा प्रचार आणि प्रसार जोमाने करत आहेत. पात्र ग्राहकांना योजनेचे फायदे समजावून सांगितले जात असल्याने थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
महावितरणच्या अभय योजनेमुळे थकीत वीजबिलांचा निपटारा करण्याची ग्राहकांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली थकबाकी निरंक करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
















