चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात कोदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संरक्षक भिंत बांधताना कुठेही अडथळा नसलेल्या ९ डेरेदार लिंबाच्या झाडांची कत्तल करणाऱ्या वर कारवाई व्हावी अशी मागणी आप्पासाहेब हिंमतराव पाटील यांनी वनविभागाकडे केली आहे.
वनविभागकडे दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, दि. २१ जानेवारी रोजी तालुक्यात जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना शाळेच्या आवारात असलेले जवळपास ९ लिंबाचे डेरेदार झाडे कापण्यात आली. ही झाडे अवैधरित्या कापली असून झाडे कापणारे यांच्या वर कारवाई व्हावी अशी मागणी आप्पासाहेब हिंमतराव पाटील रा. कोदगाव यांनी वनविभागाकडे केली आहे. याबाबत कोदगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू कुमावत यांच्या कडून माहीती जाणून घेतली असता सदर झाडे ही जीर्ण झाली होती. शाळेला संरक्षक भिंत बांधताना शाळा व्यवस्थापन समितीने ही झाडे कापण्याचा निर्णय घेतला, वनविभागाची परवानगी घेतली नाही व झाडे कापण्याचा तसा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने केला असून कापलेली झाडे विकून त्यातून आलेल्या पैशामधून शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लिंबाची झाडे जर जीर्ण झाली होती तर तसे पत्र ग्रामपंचायत अथवा गटशिक्षण अधिकारी यांना देणे आवश्यक असतांना तसे झाले नाही याचा अर्थ फक्त स्वतः च्या फायद्यासाठी व संरक्षक भिंतीला कुठेही अडथळा नसलेली लिंबाची झाडे कापणारे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील ग्रामस्थ करीत आहेत.