जळगाव (प्रतिनिधी) – दिल्ली येथे झालेल्या ७ व्या खेलो इंडिया क्रीडा – २०२५ स्पर्धेत ट्रॅक सायकलिंग प्रकारात स्क्रॅच रेसमध्ये कांस्य, टाईम ट्रायल प्रकारात रौप्य पदकासह, स्प्रिंट प्रकारात सुवर्ण पदकासह, केरिन या सायकलिंग प्रकारात स्पर्धात्मक वेळ नोंदवून आकांक्षा गोरख म्हेत्रे हिने तिहेरी यश मिळविले आहे. जळगावची सायकलपटू आकांक्षा हिने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले असून बिहार मध्ये दि. १३ ते १४ मे ला होणाऱ्या स्पर्धेत दिमाखात ती सहभागी होणार आहे.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ ट्रॅक सायकलिंग प्रकारात झालेल्या या स्पर्धेत २१ राज्यांतील सायकलपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. दि. ६ ते ८ मे दरम्यान ही स्पर्धा खेळविण्यात आली. यात जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे ने मुलींच्या ७.५ किलो मीटरच्या स्क्रॅच रेस मध्ये ११ मिनिटे ५१.६४९ सेकंद वेळ नोंदवून कांस्य पदकाला गवसणी घातली. टाईम ट्रायल प्रकारात ३८ मिनिटे ७४२ सेकंद वेळ नोंदवून रौप्य पदक मिळवून दोन पदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्प्रिंट प्रकारात वेग व क्षमतेच्या जोरावर सुवर्ण पदकाची कमाई केली. तसेच तिला शेवटच्या दिवशी केरिन या सायकलिंग प्रकारात अतिशय अटीतटीच्या तिनही फेऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वेळ नोंदवून झालेल्या अंतिम फेरी मध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ट्रॅक सायकलिंगमध्ये मिळालेल्या यशाच्या जोरावर आकांक्षा म्हेत्रे ही बिहार मधील पटणा येथे दि. १३ ते १४ दरम्यान होणाऱ्या रोड सायकलिंग मध्ये आपला उंचावलेल्या आत्मविश्वासाने सहभागी होत आहे.
महाराष्ट्राला सायकिलिंगमध्ये पदके जिंकून देणारी आकांक्षा ही मूळची जळगावची असून जैन इरिगेशनचे सहकारी गोरख म्हेत्रे, अंजली म्हेत्रे यांची कन्या आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह परिवाराने कौतूक केले आहे.