पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप निश्चित केलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्षदर्शीने साक्षीदाराने ओळखले आहे. अंदुरे आणि कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरार झाले, अशी साक्ष या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिली.
दाभोलकर खून प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या सनातन संस्थेशी संबंधित आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण ?
२० ऑगस्ट २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी शिंदे पुलावर सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला (साक्षीदार) पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी जवळच्या एका झाडावर माकड आल्याने आवाज झाला. तसेच कावळ्यांचा आवाज देखील येऊ लागल्याने या दोघांनी त्या दिशेला पाहिले. त्याच वेळी एका व्यक्तीला (डॉ. नरेंद्र दाभोलकर) दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर ती व्यक्ती काही क्षणात खाली कोसळली. त्यानंतर हे हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले आणि दुचाकीवरून पळून गेले.
अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या
या घटनेनंतर साक्षीदार जवळ गेले असता डॉ. दाभोलकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हे दृश्य पाहिल्यानंतर हे दोघे सफाई कर्मचारी आपल्या कामासाठी निघून गेले. यावेळी अंदुरे आणि कळसकर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या असे या साक्षीदाराने न्यायालयाला माहिती देताना सांगितले. आता या प्रकणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे.