नांदेड, ता. धरणगाव (प्रतिनिधी) नांदेडसह नारणे भागात बिबट्याची दशहत कायम आहे. रात्रीदेखील रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याची मागणी आता या परिसरातून केली जात आहे.
अमळनेर येथील मिस्त्री काम करणारे मजूर रात्री आठ- साडेआठ वाजेच्या सुमारास मोटारसायकलीने कामतवाडी रस्त्यावरून घराकडे येत असताना नांदेडपासून दीड किमी अंतरावर रस्त्याच्या बाजूला त्यांना बिबट्या उभा असलेला दिसला. तसेच ते मोटरसायकल वेगाने चालवून नांदेडपर्यंत आले व ही घटना त्यांनी ग्रामस्थांना सांगितली. त्यावेळी ते प्रचंड भेदरलेल्या स्थितीत होते. नांदेड, कामतवाडी, खर्दे, सोनवद मार्ग हा आतील मार्ग रात्रंदिवस रहदारीचा असून, या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. शेतकरीही भयभित आहेत.