मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पाण्याची मोटार सुरु करतांना विजेचा शॉक लागून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील पिंप्राळा येथे घडली. राधिका पुरूषोत्तम कहाते, असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकणारे पुरुषोत्तम कहाते यांचे कुटुंब कुऱ्हा येथून जवळच असलेल्या पिंप्राळा येथे वास्तव्यास आहे. शनिवारी आई, वडील, भाऊ आणि मोठी बहिण मजुरी करण्यासाठी शेतात गेल्यामुळे राधिका घरी एकटी होती. दुपारी बारा वाजेच्या सुमारास नळांना पाणी आले. त्यामुळे राधिकाने पाण्याची मोटरची पिन लावताना तिला विजेचा जोरदार धक्का बसल्यामुळे ती जागेवरच पडली.
या घटनेत राधिकाचा जागीच मृत्यू झाला. राधिका हि गावातील जि.प.च्या शाळेत तिसऱ्या वर्गात शिकत होती आणि हुशार असल्याने ती कुटुंबातील आणि शाळेतील सर्वांची लाडली होती. तिच्या अचानक आलेल्या दुर्दैवी मृत्युमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली.