चाळीसगाव (प्रतिनिधी) भडगाव रस्त्यावर हिंगोणे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याचवेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या वाहनातून जळगावला जात होते. त्यांनी तत्परतेने मदत करून या गंभीर जखमी झालेल्या तरूणास रूग्णालयात दाखल करण्यास मदत केली. तर अपघातानंतर पळ काढणाऱ्या आयशर ट्रकचालकाला पोलिसांनी पकडले.
भडगाव रस्त्यावर हिंगोणे गावाजवळ ५ फेब्रुवारी दुपारी एका २५ वर्षीय दुचाकीस्वारास भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार रस्त्यावर पडून होता, त्याचवेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या वाहनातून जळगावला जात होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने मदत करून या गंभीर जखमी झालेल्या तरूणास खाजगी रूग्णालयात दाखल करण्यास मदत केली. तसेच तरुणाच्या दुचाकीला धडक देणाऱ्या ट्रकचा पाठलाग करत चाळीसगाव शहर पोलिसांसह काही लोकांना फोन करून आयशर पकडण्यास सांगितले. त्यामुळे दुचाकीला धडक देवून पळ काढणाऱ्या आयशर चालकाला खरजई नाकाजवळ पकडण्यात यश आले. त्यानंतर आयशर चालकांला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोहारी तालुका पाचोरा येथील त्या तरुणाचा मृत्यू झाला, त्याचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले.