यावल (प्रतिनिधी) निंबादेवी धरणावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्याचा डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची सोमवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी एकुलता एक भावाचा मृत्यू झाल्याने बहिणींसह त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय-२०, रा ल. निमगाव ता. यावल) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यावल तालुक्यातील निमगाव येथे वेदांत पाटील हा आई-वडील आणि बहीण सोबत वास्तव्याला होता. सध्या तो पदवीचा शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. आज रक्षाबंधनच्या निमित्ताने सुट्टी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत सोमवारी १९ ऑगस्ट रोजी दुपारी निमगावपासून जवळ असलेल्या निंबादेवी धरण येथे फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी मित्रांसोबत जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडला. त्यानंतर तो वर आलाच नाही. त्यामुळे येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले व तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ निखिल तायडे यांनी त्याला मयत घोषित केले. दरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या एकुलता एक भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या बहिणीने आणि कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता या घटनेमुळे निमगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.