नंदुरबार (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील आंबाबारी येथील रहिवासी सिताबाई रामदास तडवी (वय ५६) या १६ जानेवारीपासून दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेल्या होत्या. त्या २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर रात्री दिल्लीहून नंदुरबारकडे येत होत्या. जयपूर स्टेशनला ट्रेनची प्रतीक्षा करीत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि आज सकाळी त्यांचा थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाला.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपेक्षा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. एकीकडे दिल्लीतील हिंसाचारामुळे आरोप प्रत्यारोप होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बातमी आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ५६ वर्षीय सीताबाई या १६ जानेवारीपासून शहाजहापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आज सकाळी त्यांचा थंडीच्या कडाक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीताबाई तडवी या शेतकरी आंदोलनात कायम सक्रिय राहिल्या होत्या. मुंबईत वन जमीन हक्कासाठी त्यांनी उपोषण केले होते. यासाठी निघालेल्या नंदूरबार ते मुंबई अशा ४८० किमी पायी यात्रेत त्या सहभागी झाल्या होता. या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते. २०१८ मध्ये सुद्धा तडवी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली होती. सीताबाई यांचे संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यासोबत आंदोलनात सहभाग राहिले आहे.
लोकसंघर्ष मोर्चाचा उलगुलांन आंदोलन, वनजमिनीचे आंदोलनमध्ये त्यांनी आदिवासींचा न्याय हक्कासाठी संघर्ष केला. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे.