नागपूर (वृत्तसंस्था) रामटेक ते तुमसर महामार्गावरील चिचाळा- कारवाही वळणावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीचालक व मागे बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास घडली. चंद्रकांत उर्फ चंदू मुरलीधर कोठे (वय ४५) व दादाराव दिलेराम हारोडे (वय ४५, रा. दोघेही रेवराळ, ता. मौदा), अशी मृतकांची नावे आहेत. मृतक हे साक्षगंध सोहळा आटोपून येत होते.
दोघेही जण रामटेक बायपास मार्गावरील देशमुख सेलिब्रेशन हॉल येथून साक्षगंध समारंभ आटोपून दुचाकी क्रमांक (एमएच ४० / ३९७२) ने रामटेकवरून रेवराळच्या दिशेने जात होते. दरम्यान, रामटेक- खिंडसी मार्गावरील शिकारा हॉटेलसमोरील चिचाळा वळणावर तुमसरवरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक व दिली. ही धडक इतकी भयावह होती की, दुचाकी चक्काचूर झाली. एकाचा पाय तुटून शरीरापासून वेगळा झाला. दोघेही जागीच गतप्राण झाले.
अपघाताची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन धाराकाविरूढ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.