करमाड जि. औरंगाबाद (वृत्तसंस्था) करमाड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीसमोर चक्कर येऊन कोसळलेल्या युगुलाने एकमेकांना मिठीत घेत जीव सोडला. दोघे मृत युगुल नात्याने दीर, भावजय असल्याचे समोर आले.
एकमेकांना मिठी मारत रस्त्यावर कोसळले
हिवरा राळ, (ता. बदनापूर) येथील काकासाहेब ( ३२) व सत्यभामा अशोक कदम (२७) अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी सायंकाळी करमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जालना रोडने झोकांड्या खात एक पुरुष व महिला येत असताना लोकांनी पाहिले. काही क्षणात या त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व ते रस्त्यावर कोसळले. त्यांना वांत्याही होत होत्या. बघ्यांनी ही माहिती त्वरित पोलिसांना कळविली. तोपर्यंत ते जोडपे रस्त्यावर हातपाय खोडत तडफडत होते. त्यांचा मोबाईलही बाजूलाच पडलेला होता. पोलिसांनी मोबाईलवरून शोध घेत त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. १०८ रुग्णवाहिकेतून दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
पोलिसांनी सांगितले, जालना जिल्ह्यातील ही महिला व तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. सत्यभामा कदम या गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आल्या होत्या. तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्या झाल्या होत्या. बहिणीचा शोध लावण्यात करमाड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी यश आले होते. तेव्हापासून करमाड पोलीस सत्यभामा यांचा शोध घेत होते. सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
बघ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर त्यांनी एकमेकांना मिठी मारली व त्याच अवस्थेत ते पडून होते. उलट्या झाल्यानंतर त्यांना झटके येत होते. उलट्या झाल्यानंतर तेथे विषारी दर्पही पसरला होता. करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजयसिंग जारवाल यांनी करमाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. शेख अनिस हे तत्काळ १०८ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोघांना चिकलठाणा येथील मिनी घाटीमध्ये उपचारांसाठी दाखल केले.
मोबाईलमुळे पटली ओळख
पोलीस घटनास्थळी आल्यावर काही अंतरावर मोबाईल पडलेला होता. त्यावरून त्यांची ओळख पटली. परंतु मोबाईलमध्ये अजून काय रेकार्डिंग आहे, याची माहिती मिळू शकली नाही.