धरणगाव प्रतिनिधी । कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, शककर्ते राजे, छत्रपती शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींसोबत आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून अनाठायी तुलना करणाऱ्या ताराचंद खेतावत नामक विकृत माणसावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे महान राजे आहेत. देशाचे प्रधानमंत्री असो की अजून कोणीही असो त्यांना छत्रपती शिवरायांच्या पायाच्या नखाची सुद्धा सर करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे होते. हजारो वर्षांच्या गुलामीचा इतिहास संपवून इथल्या स्थानिकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून स्वातंत्र्य म्हणजे काय त्याची जाणीव महाराजांनी करून दिली. सर्व परिस्थिती ज्ञात असतांना देखील महाराजांचा पोशाख परिधान केलेला नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करून ताराचंद खेतावत नामक विकृत व्यक्तीने ही जी अनाठायी तुलना केली आहे त्यामुळे दोन समाजात फूट पाडण्याचं काम होत आहे. सामाजिक तेढ निर्माण होऊन संपूर्ण देशभरात शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधित व्यक्तीवर तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी यासंदर्भात छत्रपती क्रांती सेनेच्या वतीने धरणगाव पोलीस स्टेशनच्या गुंजाळ साहेबांना निवेदन देण्यात आले. मनुवादी संस्कृतीच्या समर्थकांकडून शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर या सर्व बहुजन महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत अन्यथा सामाजिक रोषाला सामोरे जावे लागेल अशा भावना निवेदन कर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा , राष्ट्रीय किसान मोर्चा , बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या सहयोगी संघटनांनी पाठिंबा दिला.
याप्रसंगी छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका कार्याध्यक्ष सिराज कुरेशी-धरणगाव शहराध्यक्ष नगर मोमीन, बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे निलेश पवार , सामाजिक कार्यकर्ते विकास लांबोळे, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका प्रभारी गौतम गजरे, मयूर भामरे, किरण सोनवणे, विनोद बिजबीरे, अमोल कोळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.