पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला (Builders) चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला फोन करत त्याच्याकडे २० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी ६ जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याप्रकरणी नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८, रा. शिरसवाडी, वाडेबोल्हाई, ता. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय २०, रा. जयप्रकाश हाऊसिंग सोसायटी, माळवाडी, हडपसर), सुनिल गौतम वाघमारे (वय २८, रा. तारमळा रस्ता, थेऊर, ता. हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय २५, रा. दत्तनगर, थेऊर, ता. हवेली), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९, रा. संस्कृती कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी), आकाश शरद निंकाळजे (वय २४, रा. शिरसवाडी, वाडेबोल्हाई, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शहरातील एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर आरोपींनी फेक कॉल अॅपद्वारे संपर्क साधला होता. त्यासाठी पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी नवनाथ चोरामले आणि साथीदार बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात आले होते. शिरसवाडीतील जमिनीचा वाद मिटवण्यासाठी आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाला गृहप्रकल्प पूर्ण करून दिला जाणार नाही, अशी धमकी आरोपींनी दिली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांना तक्रार अर्ज दिला होता. खंडणीचा पहिला हप्ता म्हणून आरोपींनी दोन लाख रुपये मागितली.
बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गुन्हे शाखेने सापळा लावला. आरोपींना सापळा लावून पकडण्यात आले. याप्रकरणातील आरोपी किरण काकडे, सुनिल वाघमारे सराइत आहेत. आरोपींकडून सहा मोबाइल संच, दोन लाखांच्या बनावट नोटा, मोटार, दुचाकी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, संदीप बुवा, संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, विकास जाधव आदींनी ही कारवाई केली.