जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगावातील संकट हे “अस्मानी” होते, असे ठसविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे “सुलतानी” संकट होते. लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपून राहिले, त्याची फळे चाळीसगावकरांना भोगावी लागली, हे अंतिम सत्य आहे. कारण सतर्क”ने 30 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता जारी केलेल्या अलर्टमध्ये मध्यरात्रीतून होणाऱ्या अतिवृष्टीचा इशारा दिला होता, अशी खळबळजनक माहीती, वरिष्ठ पत्रकार विक्रांत पाटील यांच्या अभ्यासपूर्ण पोस्टमधून समोर आली आहे.
• ‘सतर्क’च्या तपासणीतून 31 ऑगस्ट 2021 रोजी औरंगाबादच्या कन्नड घाटात कोसळलेल्या दरडी आणि जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील पूरस्थितीला उंच ढगांचे एकच क्षेत्र कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील भागांत पहाटे 1 ते 4 दरम्यान अतिवृष्टी झाली. ही अतिवृष्टी आहे, ढगफुटी नाही!
• “सतर्क”ने 30 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता जारी केलेल्या अलर्टमध्ये मध्यरात्रीतून होणाऱ्या अतिवृष्टीचा इशारा दिला होता. चाळीसगाव व कन्नड घाट परिसरातील आकाशात झालेली पावसाच्या ढगांची एकत्रित गर्दी दाखवणारा धोकेदायक रेड झोन स्पष्टपणे दाखविणारी इमेजही या अलर्टमध्ये होती. भारतीय हवामान खात्याने (IMD) अतिवृष्टीचा अंदाज जाहीर केला होता. हे सारे पाहता अचानक आलेल्या या कोल्हेकुईला काही अर्थ नाही. चाळीसगावातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झोपून राहिले, जळगाव जिल्हा प्रशासन झोपून राहिले. अलर्ट आल्यानंतर त्याच रात्री चाळीसगाव शहरातील नागरिकांना तात्काळ सूचित केले जायला हवे होते. उंचावर, सुरक्षित जागी त्यांना आपले सामान हलविण्याच्या सूचना द्यायला हव्या होत्या. ग्रामीण भागात तात्काळ खबरदारीच्या सूचना द्यायला हव्या होत्या. चाळीसगाव शहरातील नेते, अधिकारी, प्रशासन आणि जळगाव जिल्ह्यातून प्रशासनाचे हे अपयश आहे. आपत्ती निवारणात सारे झीरो ठरले आहेत; त्यामुळे आता उगाचच मगरीचे अश्रू ढाळत कुणी देखाव्याचे हिरो बनण्याची गरज नाही! निसर्गाच्या माथी खापर फोडता येणार नाही. धोक्याची सूचना आली होती, आपत्ती निवारण यंत्रणांनी काय काम केले? कन्नड घाटात जाऊन हिरोगिरी करणाऱ्यांनी आदल्या रात्री अलर्टनंतर काय दिवे लावले, याचा हिशेब घ्यायला हवा.
-Vikrant@Journalist.Com
8007006862(WA)
(पोस्टसोबत आदल्या रात्री 9 वाजेचा भीषणता दाखविणारा अलर्ट आणि ढगफुटी नव्हे अतिवृष्टी असल्याचे प्राथमिक निष्कर्ष)
















