मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या, असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. ‘आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा’ असा सल्लावजा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला. तसंच, आता तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? असा टोलाही मलिक यांनी फडणवीस यांना लगावला.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
केंद्राची ही भूमिका पहिल्या दिवसापासून होती, हा सर्व अधिकार राज्याचा आहे, ज्यावेळी कायदा तयार झाला १०२ वी घटना दुरुस्ती झाली, तेव्हा सभागृहात आणि स्टँडिंग समितीमध्ये केंद्रानं हे स्पष्ट केलं होतं, १०२ घटना दुरुस्ती नंतरही राज्याचे अधिकार हे राज्यालाच राहतील आणि केंद्राचे अधिकार हे केंद्राला राहतील. असं असताना देखील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांमध्ये दुमत झालं, आणि दोन न्यायाधीशांनी राज्याचे अधिकार राज्याकडे राहतील असं स्पष्ट केलं, अशी भूमिका फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर मांडली.
तसंच, ‘दोन न्यायाधीशांनी १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर मागास घोषित करण्याचे अधिकार राज्याने केंद्राकडे पाठवायचे आहेत असल्याचं सांगितलं, एक न्यायाधीशांनी त्यांना समर्थन दिलं, तीन विरुद्ध दोन असं मत होऊन केंद्राकडे आहे असं प्रतिपादित करण्यात आलं. यासंदर्भात केंद्रानं हे अधिकार राज्याचे आहेत यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली, सगळं आम्ही करायचं आणि राज्यानं केवळ माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालायचं?’असा सवालच फडणवीस यांनी उपस्थिती केला होता.