धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील इंदिरा गांधी कन्या हायस्कूल येथून ते मेन रोड पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. परंतु हे काम नित्कृष्ट दर्जाचे असून जुन्या रस्ताची कोणत्याही प्रकारे लेव्हलिंग न करता काम करण्यात आले आहे. याच गोष्टीच्या आधारे आज भाजपच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
भाजपच्या वतीने सां.बांधकाम विभागात तक्रार अर्जात म्हंटले आहे की, ये-जा करणाऱ्या विद्यार्थी उतार व चढाव असल्याने सायकली वरून खाली पडत आहेत. एका विद्यार्थीचा खाली पडल्यामुळे हाथ तुटला आणि उतार अधिक असल्याने सायकलीचा ब्रेक लागला नाही तर यामुळे मुख्य रस्त्यावर मोठया गाडीवर आदळन्याची शक्यता आहे. त्यातून जीवितहानी देखील होऊ शकते तसे झाल्यास संबंधित बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व सदरील कामाची जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करावी त्यानंतरच बिल अदा करावे. तसेच संजय नगर येथील गटारीचे व पेव्हर ब्लॉकचे बांधकामाची चौकशी करावी तेथे देखील मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून गटारी अपूर्ण अवस्थेत पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. म्हणून संजय नगर भागातील पेव्हर ब्लॉक व गटारीची चौकशी करावी व त्यानंतर बिल अदा करावे. तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.
यावेळी शिरिषआप्पा बयास, अँड. संजय महाजन, अँड. वसंतराव भोलाने, पुनीलाआप्पा महाजन, गटनेते कैलास माळी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, मधुकर रोकडे, नगरसेवक ललित येवले, कडुअप्पा बयास, शरद आण्णा धनगर, सुनील चौधरी, वासुदेव महाजन, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, जितेंद्र महाजन उपस्थित होते.