धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाणे गावात एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी ३ घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरट्यांना एक किराणा दुकान फोडण्यात अपयश आले असले तरी चोरी केलेल्या एका घरातून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड हाती लागल्याची माहिती समोर येत आहे.
धरणगाव पोलीस स्थानकाचे पोहेका करीम सय्यद, कैलास पाटील, समाधान भागवत हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल असून चौकशी सुरु आहे. तालुक्यातील पष्टाणे येथील तीन बंद घरे चोरट्यांनी फोडली आहेत. तर एक किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न अपयशी झाला आहे. दरम्यान, एका बंद घरातून लाखो रुपयाचे व सोने चांदीचे दागिने तसेच ३० ते ४० हजाराची रोकड लंपास झाल्याची माहिती समोर येत आहे. येथील रहिवासी वना धोंडू पाटील, दिलीप रघुनाथ पाटील, पंढरीनाथ त्रंबक पाटील यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
















