धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीसाठी आज मतदान झाले. सोसायटीत एकूण ६८७ मतदार त्यापैकी ६०२ मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा पुरस्कृत पॅनल असा सामना रंगला आहे.
नूतन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा असा सामना बघायला मिळाला. या लढतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते. कारण या निवडणुकीकडे नगरपालिकेची रंगीत तालीम म्हणून बघितले जात आहे. आज सकाळी ८ वाजेपासून पी. आर. हायस्कूलमधील बुथवर मतदानाला सुरुवात झाली. यावेळी सर्वच पक्षाचे नेते सकाळपासून परिसरात ठाण मांडून होते. अगदी पालिका निवडणुकीप्रमाणे मतदान केंद्राच्या परिसरात जबरदस्त कार्यकर्त्यांची गर्दी होती. सकाळी मतदान केंद्रात जाण्या-येण्यावरून दोन्ही पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. परंतू नंतर वातावरण निवळले. परंतू चार वाजेला मतदान संपेपर्यंत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त टशन बघायला मिळाली.
‘माविआ’ पुरस्कृत सहकार पॅनलचे चिन्ह छत्री तर भाजप पुरस्कृत शेतकरी पॅनलचे चिन्ह कपबशी होते. सहकार पॅनलकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासारखे दिग्गज हे उमेदवारीच्या रिंगणात होते. सोसायटीत एकूण ६८२ मतदान होते. त्यापैकी ६०२ मतदान झाले आहे. सोसायटीत १३ जागा असून त्यात ८ सर्वसाधारण, २ महिला, १ एससी, १ एनटी आणि १ ओबीसीची जागा आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून या जागांचा निकाल लागणार आहे. निकालाची उस्तुकता धरणगावकरांमध्ये जबरदस्त ताणली गेली आहे. दरम्यान, मतदारांना २ हजार रुपये फुली वाटण्यात आल्याची गावात जोरदार चर्चा आहे.