धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा दि.२५ व २६ रोजी उत्साहात संपन्न झाला. १९८५ च्या बॅचचे विद्यार्थी, या निमित्ताने ३८ वर्षांनंतर एकत्र आले होते. या स्नेहसंमेलनासाठी बाहेरगावून आलेल्या विद्यार्थ्यांनी प.रा.विद्यालयात जाऊन भेट दिली. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले व शाळेच्या प्रगतिची माहिती दिली. अनेक मित्रांनी पुन्हा एकदा आपल्या वर्गात जाऊन, शालेय बाकावर बसण्याचा आनंद घेतला.
सर्वांनी धरणगावचे श्रद्धास्थान श्री बालाजी मंदिरास भेट दिली. तेथील नवीन बांधकामाबद्दल माहिती विलास येवले व गुलाबराव वाघ यांनी दिली. नंतर कुमार थिएटरमध्ये जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. कुमार थिएटरचे मालक व वर्गमित्र केवल भाटिया यानी थोडा वेळ “शोले” हा सिनेमा सुरू करुन सर्व मित्रांना १९७५ ते १९८५ च्या काळात नेले. यानंतर धरणगावचे दैवत श्री चिंतामण मोरया देवस्थानास भेट दिली व दर्शन घेतले.
रात्री सचिन भावसार यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन लिटिल ब्लॉसम शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी प्रवीण माळी (शिरपूर) यांच्या “आयतं पोयतं संख्यान” या एकपात्री प्रयोगाने धमाल उडवून दिली. कार्यक्रमात १९८५ च्या गुरुजनांचे शाल, बुके व स्मृतिचिन्ह देऊन हृद्य सत्कार करण्यात आले. यात व्ही.एन.गुजराती, एम.जी.उपासनी, आर.बी.बोरसे, एस.जी.वाजयेयी व उत्तम चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष अरुण कुलकर्णी, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, माजी मुख्याध्यापक प्रा. बी.एन.चौधरी, गुलाबराव वाघ उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जैन यांनी केले तर प्रास्ताविक ॲड.राजेंद्र येवले यांनी तरआभार प्रदर्शन दर्शन डहाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल जैन, प्रभाकर झाम्बरे, श्रेयान्स जैन, केवल भाटिया व विनोद कुमट यांनी परिश्रम घेतले.