धरणगाव (प्रतिनिधी) शहादा येथील तरुणाने धरणगाव येथील अल्पवयीन मुलीचा फोटो सोशल मिडीयावर बदनामी कारक मजकूर व्हायरल करून बदनामी केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अस्लम सलीम खान याच्याविरुद्ध नोव्हेंबर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तेव्हापासून संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी सोमवारी पद्धतशीरपणे अस्लमला शहादा पोलिसांच्या मदतीने अटक केली.
यासंदर्भात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या लहान मुलीचा साखरपुडा अस्लमखान सलीम खान (रा. शहादा) याच्यासोबत धरणगाव येथे झाला होता. त्यानंतर पिडीत मुलीवर मागील काही महिन्यांपूर्वी संशय घेऊन अस्लम खान याने त्याचे आई-वडील आणि नातेवाईक अशांना सोबत घेऊन धरणगाव येथे पिडीत मुलीच्या घरी येऊन साखरपुडा मोडून टाकला होता. धक्कादायक म्हणजे साखरपुडा मोडल्यानंतर अस्लम हा पिडीत मुलीच्या मोबाईल क्रमांकावर सतत फोन करून सांगायचा की, माझ्याशी लग्न नाही केले तर मी मरून जाईल.
अस्लम खान हा त्याच्या मोबाईल क्रमांकांवरून पिडीत मुलीच्या वडील व माझे नातेवाईक अशांना फोन करायचा. दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिडीत मुलीच्या वडील बारामती तेथे असतांना त्यांच्या मोबाईलवर धरणगाव येथील समाजबांधव रियाजोद्दिन लाडजी शेख यांनी फोन करुन कळविले की, अस्लम सलीम खान याने त्याच्या मोबाइल क्रमांकावरून एका व्हाट्सअपग्रुपवर पिडीत मुलीचे फोटो व्हायरल करून त्याखाली पिडीत मुलीचा मोबाईल क्रमांक टाकून आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. त्यानंतर याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अस्लम सलीम खान याच्याविरुद्ध पोस्को आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
साडेचार महिन्यानंतर ‘अशा’ पद्धतीने आवळल्या मुसक्या !
गुन्हा दाखल झाल्यापासून अस्लम खान हा पोलिसांना गुंगारा देत होता. अस्लम वेळोवेळी सिमकार्ड बदल करत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचे लोकेशन कळत नव्हते. दरम्यान, एकेदिवशी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना अस्लमचा मोबाईलनंबर गोपनीय सूत्रांनी दिला. त्यानंतर पो.नि. शेळके यांनी अस्लमला व्हाट्सअपवर चॅटिंगमध्ये व्यस्त ठेवत दुसरीकडे त्याचे तात्काळ लोकेशन काढून घेतले. त्यानंतर शहादा पोलिसांची मदत घेत सोमवारी सायंकाळी त्याला घरून ताब्यात घेतले. त्यानंतर आज पहाटे एक पथक पाठवून संशयित अस्लमला ताब्यात घेत धरणगाव आणले. दरम्यान, संशयित अस्लमला आज न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.