धरणगाव (प्रतिनिधी) वाळू माफियांविरुद्ध धरणगाव पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून, मंगळवारी (१४ फेब्रुवारी) सावखेडे, निमखेडी, बांभोरी नदी पात्रात पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी स्वत: उतरत कारवाईचा बडगा उगारला आहे.
पात्रातील वाढलेला वाळू उपसा तसेच तस्करीला लगाम घालण्यासाठी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी आपल्या पथकासह आज सकाळपासूनच कारवाईची धडक मोहीम सुरु केली. त्यानुसार सावखेडे, निमखेडी, बांभोरी नदी पात्रात कारवाई केली. यावेळी काही वाळू माफिया पळून जाण्यात यशस्वी झालेत. तर काहींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मागील दिवसांपासून तालुक्यातील वाळू माफिया बेलगाम झाल्याचे चित्र होते.
अगदी भरदिवसा देखील वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात उघडपणे सुरु होती. पोलीस प्रशासनाकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच बांभोरी आणि सावखेडा येथील पुलाला धोका पोहचेल एवढ्या धोकादायक पातळीपर्यंत वाळू माफियांनी वाळू उपसा करण्याचा उद्योग सुरु केलेला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने धडक कारवाईचे अस्त्र उगारले आहे. दरम्यान, अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा ईशारा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिला आहे.