धरणगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलचा दुसरा हप्ता जमा करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच घेणाऱ्या गृहनिर्माण कंत्राटी अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३१) सह सागर शांताराम कोळी (वय ३०, रा.निंभोरा, ता. धरणगाव) या पंटरला दहा हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारच्या सुमारास झाली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांना सन २०२४-२५ या ब्लॉकमध्ये पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले आहे. या योजनेतुन घरकुलचा पहीला हप्ता दि. ३ फेब्रुवारी रोजी १५ हजार त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असून त्यातून त्यांनी घराचे बांधकाम केले आहे. त्यांना मंजुर झालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता जमा झाला नसल्याने त्याबाबत विचारपुस करण्यासाठी पंचायत समीती धरणगाव येथे गेले होते. त्यावेळी घरकुल संबंधीत काम करणारे अभियंता गणेश पाटील यांना भेटुन त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांनी सध्या निधी नसल्याचे सांगीतले. परंतु त्यांच्या गावातील लोकांकडुन माहीती मिळाली की, त्यांच्या घरकुलाचा दुसरा हप्ता जमा झालेला आहे. म्हणुन तक्रारदार दि. ८ जुलै रोजी पंचायत समिती येथे जावून गणेश पाटील यांची भेट घेवून विचारपूस केली.
सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले
अभियंता गणेश पाटील यांनी घरकुलाचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी दि. १४ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी कंत्राटी अभियंता गणेश पाटील यांनी खासगी पंटर सागर कोळी यांचे मोबाईल फोन वरून लाचेची रक्कम सागर कोळी यांचे मार्फतीने स्वीकारण्यास संमती दिली. तसेच सागर कोळी याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवुन प्रोत्साहन दिले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















