धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यासह शहरातील अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या आशयाची तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी मंगळवारी केली होती. परंतू तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तक्रारदार श्री. माळी यांच्याविरुद्धच चक्क खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे.
या संदर्भात अधिक असे की, मागील काही दिवसापासून सोशल मीडियात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफियांविरुद्ध कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी सोशल मिडीयाच्या माधमातून आवाज उठविला होता. याच संदर्भात मंगळवारी रामचंद्र माळी ही तक्रार देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे गेले. परंतू तहसिलदारांनी अरे तुरेचे भाषा करत त्यांना हाकलून लावल्याचा आरोप श्री. माळी यांनी केला होता. एवढेच नव्हे तर श्री. माळी यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे फोनवरून तहसीलदार यांनी हाकलून लावले व पोलिसांची धमकी दिली, अशी तक्रार केली होती. त्यावर श्री. राऊत यांनी मला तक्रार पाठवा मी कारवाई करायला सांगतो असे आश्वासन दिले. हीच तक्रार श्री. माळी प्रांतधिकारी विनय गोसावी यांना व्हाटसअपला पाठवली. एवढेच नव्हे तर यासंदर्भात पुरावा म्हणून माळी यांनी पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेची ऑडीओ क्लिप, तक्रार पाठविल्याचे स्क्रीन शॉट, प्रांतअधिकाऱ्यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीचे स्क्रीन शॉट पाठवले. याबाबत त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही मेलवरून तक्रार केली आहे.
दुसरीकडे आज तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी रामचंद्र माळी यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तुम्ही मला रेती साठे कुठे-कुठे आहेत ते दाखवा, मी लगेच पंचनामे करतो. परंतु त्यावर काहीतरी पैसे देण्याकरिता ते मला प्रवृत्त करण्यासाठी मुद्दाम तक्रार करायचे म्हणून बोलत होते. तसेच तुमचे काही असेल तर माझेही आर्थिक बघा, असेही ते म्हणाले. वास्तविक त्यांच्या तक्रारीत कोणती तथ्य दिसून येत नाही. केवळ पैशांच्या मागणी करून खंडणी मागणे हीच बाब दिसून आलेली आहे. तसेच रामचंद्र माळी यांच्यावर तहसीलदार यांच्या सोबत असभ्य वर्तन करणे आधारहीन तक्रारी करणे बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन पैसे देण्याकरिता प्रवृत्त करून खंडणी मागणे इत्यादी बाबत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अवैद्य वाळू वाहतूकदारांविरुद्ध कडक कारवाई : नितीनकुमार देवरे (तहसिलदार धरणगाव)
तक्रारदारला दी. २७ रोजी तुम्ही स्वतः माझ्या सोबत शासकीय वाहनात वाळूचे साठे आहेत, त्या ठिकाणी सोबत चला. मी पंचनामा करतो, असे सांगितले. त्यावर तक्रारदार मी कशाला येऊ?, तुम्ही तुमचे शोधा, असे सांगितले. त्यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नव्हते. आतापर्यंत १९ वाहनांवर अवैद्य वाळू वाहतूकीची कारवाई केली आहे. माझ्यावर वाळू वाहतुकदारांनी हल्ला केला, तरी देखील वाळू माफियाबद्दल कठोर भूमिका घेतली आहे.
—————————
खोट्या गुन्ह्यांना घाबरत नाही : रामचंद्र माळी (कॉंग्रेस, सरचिटणीस)
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मला पोलिसांची धमकी दिली, हे मंगळवारीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीबाबतचे पुरावे मी आपल्याला दिले आहेत. माझ्या तक्रारीत तथ्य नव्हते, असे तक्रारीत तहसीलदार यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ धरणगाव अवैध वाहतूक सुरु नव्हती, असे तहसीलदार साहेबांना म्हणायचे आहे. मग त्यांच्यावर वाळू माफियांनी मध्यरात्री केलेला हल्ला तसेच त्यांनी मागील काही दिवसात साधारण १५-२० वाळू वाहतूकदारांवर कारवाई कशी केली?, असा माझा त्यांना प्रश्न आहे. मी खोट्या गुन्ह्यांना घाबरणारा नाही. माझा लढा सुरूच राहील !