धरणगाव (प्रतिनिधी) आमच्या कार्यकर्त्याने चूक केली केली असेल तर आम्ही मुळीच पाठीशी घालणार नाही. परंतू तक्रार वाचल्यानंतर लक्षात येतेय की, यात काही तरी वेगळा प्रकार आहे. याबाबत आज सकाळीच मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला होता. परंतू ते मिटिंगमध्ये होते, दुपारी त्यांचा फोन येणार आहे. त्यावेळी संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घालून या प्रकरणात लक्ष घालणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे.
संदीपभैय्या पाटील पुढे म्हणाले की, खंडणीच्या गुन्ह्यासाठी सबळ पुरावे लागतात. कोर्टाच्या भाषेत सांगायचं झालं तर ही केस कितपत टिकेल हे सांगता येणार नाही. आमचा कार्यकर्ता चुकला असला तर आम्ही पाठीशी घालणार नाही. परंतू त्याला का त्रास दिला जातोय?, हे बघावं लागेल. याबाबत आज सकाळीच मी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला होता. परंतू ते मिटिंगमध्ये होते, दुपारी त्यांचा फोन येणार आहे. त्यावेळी संपूर्ण प्रकार त्यांच्या कानावर घालून या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे श्री. पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण
तालुक्यासह शहरातील अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या आशयाची तक्रार कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी केली होती. परंतू तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तक्रारदार रामचंद्र माळी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. मागील काही दिवसापासून सोशल मीडियात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू माफियांविरुद्ध कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांनी सोशल मिडीयाच्या माधमातून आवाज उठविला होता. याचसंदर्भात मंगळवारी रामचंद्र माळी ही तक्रार देण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे गेले. परंतू तहसिलदारांनी अरे तुरेचे भाषा करत त्यांना हाकलून लावल्याचा आरोप रामचंद्र माळी यांनी केला होता. एवढेच नव्हे तर रामचंद्र माळी यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे फोनवरून तहसीलदार यांनी हाकलून लावले व पोलिसांची धमकी दिली, अशी तक्रार केली होती. त्यावर अभिजित राऊत यांनी मला तक्रार पाठवा मी कारवाई करायला सांगतो असे आश्वासन दिले. हीच तक्रार रामचंद्र माळी प्रांतधिकारी विनय गोसावी यांना व्हाटसअपला पाठवली. एवढेच नव्हे तर यासंदर्भात पुरावा म्हणून माळी यांनी पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेची ऑडीओ क्लिप, तक्रार पाठविल्याचे स्क्रीन शॉट, प्रांतअधिकाऱ्यांना पाठवलेल्या लेखी तक्रारीचे स्क्रीन शॉट पाठवले. याबाबत त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही मेलवरून तक्रार केली होती.