धरणगाव (प्रतिनिधी) स्टेट बँक म्हटलं की सर्वसामान्य लोकांची पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे स्टेट बँक नको रे बाबा! परंतु गेल्या दोन वर्षात धरणगाव स्टेट बँकेने आपला चेहरा मोहरा अक्षरशः बदलून टाकत ग्राहकामुख बँक अशी प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले आहे.
जळगाव येथील सहाय्यक महाव्यवस्थापक श्री धर्मेंद्र कुमार सिंग आणि मुख्य व्यवस्थापक युवराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक गणेश अशोक दुरगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने धरणगाव स्टेट बँकेला सर्वसामान्य लोकांची आवडती बँक अशा स्वरूपात बदलून टाकले आहे.
सध्या धरणगाव स्टेट बँकेने शेती व शेती निगडित व्यवसाय बचत गटांना कर्ज वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. धरणगाव तालुक्यातील 300 महिला बचत गटांना चार कोटीचे कर्ज वाटप केल्याने तालुक्यातील तीन हजार महिलांना स्वयंपूर्ण होत आले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना स्टेट बँकेतून कर्ज मिळणे कठीण होते. परंतु दोन वर्षाच्या काळात धरणगाव तालुक्यातील 270 शेतकऱ्यांना पीक कर्ज म्हणून दोन कोटी 89 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायासाठी मका व धान्य प्रक्रिया उद्योगांना खते व औषधे बी बियाणे व्यवसायिकांना मका ट्रेडिंग व्यवसायिकांना सुमारे 30 कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात आले असून गृह कर्ज वैयक्तिक कर्ज वाहन कर्ज शैक्षणिक कर्ज निवृत्ती वेतन धारकांसाठी पेन्शन कर्ज या कर्जांच्या प्रक्रिया सुलभ रीत्या पार पाडून त्वरित कर्ज मंजुरी देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. ग्राहक कोणती समस्या घेऊन आल्यास शाखा व्यवस्थापक स्वतः त्या समस्येचे निरसन करतात. तसेच तालुक्यातील विविध भागांमध्ये बँकेची अधिकृत 12 ग्राहक सेवेत सेवा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यासाठी शाखा व्यवस्थापक गणेश दुरगुडे हे क्षेत्र अधिकारी कौस्तुभ जोशी, रविकांत सोले, अनिकेत आव्हाड, ललित लोणारी, कौस्तुभ शिंदे, रोहित धनगर यांचे सह निंबा पारधी, दिगंबर साळुंखे व ईश्वर भामरे या कर्मचाऱ्यांसह आपली बँक लोकाभिमुख करण्यात यशस्वी झाले आहेत.















