धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रेल येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून कान कापून कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, २९ डिसेंबर रोजी रात्री (वेळ निश्चित माहित नाही) विमलबाई श्रीराम पाटील (वय ७०, रा. रेल ता. धरणगाव ) ह्या घराच्या वरील पत्री शेडमध्ये एकटी झोपलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लु कान कापून तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करुन चोरुन नेले. सकाळचे ९ वाजले तरी आजी खाली उतरली नाही म्हणून शेजारची महिला वर बघायला गेल्या तेव्हा आजी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या.
घटनेची माहिती मिळताच नातू निलेश मच्छिंद्र पाटील (रा. पिंप्री ता. धरणगाव) घटनास्थळी पोहचले. यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजी जवळ साधारण ५० हजाराची रोकड असल्याचे देखील निलेश पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे. चोपडा विभागीय अधिकारी कृषीकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी भेट दिली. तर पुढील तपास स.पो.नि. गणेश बुवा हे करीत आहेत.
पाचोरा तालुक्यात वृद्धाचे हातपाय बांधून तीन लाखांची रोकड लंपास !
पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील एकनाथ पांडू पाटील (वय ८८) हे दि.२९ डिसेंबर (गुरुवार) दुपारी घरी एकटेच होते. घरातील महिला शेजारी पापड करण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी एक दरोडेखोर चाकू घेऊन घरात शिरला. त्याने पाटील यांच्या तोंडात बोळा कोंबला आणि त्यांचे हात-पाय बांधून कपाटाजवळ घेऊन गेला. चोरट्याने कपाटात ठेवलेली ३ लाख १० हजारांची रोकड व सोन्याचे दागिने यात सोन्याची बिस्किटे, तुकडा, मंगळसूत्र, चपलाहार, सोन्याच्या बांगड्या आदी वस्तू नेल्या.