नांदेड, ता. धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही वर्षापासून धरणगाव तालुका वाळू तस्करीसाठी कुविख्यात झाला होता. परंतू नवीन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार सांभाळताच वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम सुरु केली आहे. वाळू चोरीचे रस्ते बंद केल्यानंतर आता चक्क नांदेड गावाजवळ ठिकठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले तब्बल शंभर ब्रास वाळूसाठे जप्त केले आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
मागील काही वर्षापासून धरणगाव तालुक्यातील वाळू माफिया भलतेच मुजोर झालेले होते. अगदी महसूल विभाग खिशात असल्यागत काही जण वागत होते. अगदी तहसीलकार्यालयातील त्यांचा वावरही त्याच पद्धतीचा होता. परंतू तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरु केल्यामुळे धरणगाव महसूल विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा उंचवायला सुरुवात झाली आहे.
सुरुवातील तहसीलदार सूर्यवंशी यांनी नांदेड गावातील वाळू चोरट्यांचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने चर खोदून बंद केला. यामुळे चोरट्या वाळू वाहतुकीलगाम बसला होता. पावसाळ्यात जादा दराने वाळू विकता यावी, यासाठी परिसरात काही वाळूमाफियांनी वाळूचे साठे तयार करून ठेवले होते. याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यवंशी यांनी वाळूसाठ्यांना जप्त करण्याचे आदेश दिलेत. बुधवारी तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संदीप मोरे, नांदेडचे प्रभारी तलाठी भागवत पवार, बाभूळगावचे तलाठी शेख, पोलिस पाटील शशिकला सैंदाणे यांनी पंचनामे केले.
पंचनामे करण्यात आलेली वाळू उचलून धरणगावला शासकीय जागेतनेण्यात येणार होती. परंतू पावसामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे तहसीलदार सूर्यवंशी यांनी दिवसरात्र या साठ्यांवर गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. जप्त वाळूसाठ्यांची जबाबदारी पोलिस पाटील व कोतवाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.