धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या जैन गल्लीतील एक बंद घर फोडल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली होती. परंतू या चोरी प्रकरणी एक मोठी माहिती समोर येत आहे. चोरट्यांनी जेवढा ऐवज चोरून नेला, त्यापेक्षा अधिकचा ऐवज सोडून पोबारा केल्याचे कळतेय. त्यामुळे चोरटे अडाणी…भामटे…नवखे की, आणखी काही ?, असा प्रश्न निर्माण झालाय.
नेमकं काय म्हटलंय फिर्यादीत
याबाबत अनंत भास्कर विभांडीक (वय 56, धंदा व्यापार रा. घर नं. 2053, जैन गल्ली) पोलिसात तक्रार दिली आहे की, त्यांचे राजकमल ज्वेलर्स नावाचे दुकान चालवुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते घरास कुलूप लावून परीवारासह नाशिक येथे मामांकडे गेलो होते. त्यानंतर आज दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या शेजारी राहणारे संदीप जगपात यांनी फोन करुन कळविले की, तुमच्या घराचे कुलुप तोडलेले दिसत आहे. म्हणून अनंत विभांडीक यांनी ओळखीचे दिपक शंकरशेठ बागुल यांना याबाबत कळवून घरी काय झालेय? याबाबत खात्री करण्यासाठी सांगीतले. त्यानुसार बागुल यांनी घरी जावुन खात्री केली असता घराचे कुलुप कोणीतरी तोडले होते. तसेच घरातील सामान अस्तावेस्त पडलेला असल्याचे फोनवरुन सांगितले. अनंत विभांडीक हे परीवारासह नाशिक येथून घरी धरणगाव येथे परत आल्यावर लोखंडी कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीची व रोख रुपयांची खात्री केली.
असा ऐवज झालाय चोरी
1) 4 लाख 48 हजार किंमतीचे सोन्याच्या धातुचे एकुण 112 ग्रम वजनाचे दोन तुकडे ( एक तुकडा 72 ग्रम व दुसरा 40 ग्रम वजनाचा) 2) 30 हजार किंमतीचे चांदीच्या धातुचे जुने शिक्के व लक्ष्मीच्या 2 मुर्त्या एकुण 1 कि.ग्र वजनाच्या 3) 20 हजार रुपये रोख त्यात 10,20,50 रुपयाच्या नोटा असा एकुण 4 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज असा लंपास करण्यात आला आहे.
चोरटे अडाणी…भामटे…नवखे की, आणखी काही ?
चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या घटनास्थळी गेल्यावर लक्षात आले की, घरात लाखोंची रोकड सुरक्षित आहे. एवढेच नव्हे तर चोरीला गेले त्याहून अधिक किंमतीचे सोने-चांदीचे दागिनेही सुरक्षित होते. त्यामुळे चोरटे अडाणी…भामटे…नवखे की, आणखी काही ?, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर, घरातील सर्व सुरक्षित वस्तूंचे फोटो देखील घेतले आहेत.