धरणगाव (प्रतिनिधी) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूक चुरशीची होणार असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतू अंतिम चित्र माघारी स्पष्ट होणार आहे. तर ५ जून रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी दुपारी चार वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
येथील विविध कार्यकारी सोसायटीत एकूण १३ जागा असून त्यात ८ सर्वसाधारण, २ महिला, १एससी, १ एनटी आणि १ ओबीसीची जागा आहे. १३ जागांसाठी एकूण ६१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी अंती १ अर्ज बाद झाला असून एकूण ६० उमेदवार रिंगणात आहेत. माघारीची अंतिम मुदत २४ मे पर्यंत आहे. तर ५ जून रोजी दुपारी चारपर्यंत मतदानाची वेळ आहे. चार वाजेनंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत ८७३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यंदाची विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. या सोसायटीवर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी आणि राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन या दोघं नेत्यांची पकड होती. परंतू यावेळेस भाजपचे शिरीष बयस यांनी देखील स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या दृष्टीने आपले उमेदवारांचे फॉर्म भरले आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुरेशनाना चौधरी आणि ज्ञानेश्वर महाजन हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने एकत्र आले तर ‘मविआ’ विरुद्ध भाजप अशी लढत देखील बघायला मिळू शकते. परंतू अंतिम चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे.