धरणगाव (प्रतिनिधी) शासनामार्फत नव्याने दिलेल्या 4G E-Pos मशीन सदोष असल्याने या E-Pos मशीनवर धान्य वितरण करताना अनेक तांत्रिक समस्या उद्भवत आहेत. तसेच सातत्याने होणारे सर्वर डाऊन यामुळे देखील राज्याचे धान्य वितरण प्रलंबित राहत आहे. या समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे’ कडून राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये E-Pos मशीन शासनाकडे परत करण्याचे आंदोलन सोमवार, दिनांक 05 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.
सातत्याने होणाऱ्या सर्वर डाऊन मुळे जुलै, 24 महिन्याचे धान्य वितरण पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने दिनांक 30 जुलै, 2024 रोजी ऑफलाइन धान्य वितरणाची केलेली घोषणा ही पूर्णतः फसवी आहे. याचे कारण की, सुमारे 30 ते 40 वर्ष सेवा देणाऱ्या रास्त भाव दुकानदारांवर थोडाही विश्वास न ठेवता शासकीय कर्मचारी म्हणून कोतवालांच्या उपस्थितीत धान्य वितरण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वास्तविक पाहता राष्ट्रीय ‘अन्नसुरक्षा अधिनियम, 2013’ नुसार सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये रास्त भाव दुकानांचे योग्य प्रकारे कार्यान्वयन ही सर्वस्वी राज्य शासनाची जबाबदारी असल्याने रास्त भाव दुकानदारांना योग्य त्या सुविधा देणं तसेच धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडीअडचणी व समस्यांची सोडवणूक करणे ही राज्य शासनाचे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच इतर कोणाच्याही भूलथापांनाळी न पडता राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी सोमवार, दिनांक 05 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालय समोर E-Pos मशीन तहसील कार्यालयात जमा करणार आहेत.