अहमदाबाद (वृत्तसंस्था) कुत्र्याचं नाव ‘सोनू’ ठेवल्यानं झालेल्या भांडणातून शेजारील महिलेच्या पतीने कुत्र्याची मालकीन असलेल्या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. एका महिलेनं आपल्या कुत्र्याचं नाव शेजारील महिलेच्या नावासमान ठेवलं होतं. त्यावरुन झालेल्या वादात शेजारील व्यक्तीने चक्क महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नीताबेन सरवैया असं या महिलेचं नाव आहे.
भावनगर येथील सरकारी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली असून महिलेची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. याप्रकरणात महिला गंभीर जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीताबेन सुरवैया यांचे पती आणि दोन्ही मुलं बाहेर गेले होते. सोमवारी आपल्या लहान मुलासमवेत त्या घरीच होत्या. त्यात, दुपारच्यावेळेत त्यांचे शेजारी सुराभाई भरवाड आणि इतर ५ जणांनी नीताबेन यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला. सुरवैया यांनी आपल्या कुत्र्याचं नाव सोनू ठेवलं होतं. त्यामुळे भरवाड यांनी तीव्र आक्षेप घेत संताप व्यक्त केला. तसेच, जाणूनबुजून या कुत्र्याचं नाव माझ्या पत्नीच्या नावासमान ठेवल्याचा आरपोही त्यांनी केला होता.
नीताबेन यांच्या घरी आलेल्या भरवाड यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच, त्यांच्यासमवेत आलेल्या इतर तिघांनी किचनमध्ये जाऊन त्यांचा पाठलाग केला. त्यापैकी एकाने रॉकेलचा डब्यातील तेल सुरवैया यांच्या अंगावर टाकले आणि आगपेटीने काडी लावून जाळल्याचा आरोप फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेच्या जोरजोरात ओरडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचवेळी महिलेचे पतीही तेथे आले अन् त्यांनी अंगात परिधान करणाऱ्या कोटने ही आग विझवली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.