भुसावळ प्रतिनिधी । येथील राहुलनगर भागात जोरदार पावसामुळे दरड कोसळल्याने या भागातील अनेक हातमजूर गोरगरीब कुटुंबाची घरे उद्ध्वस्त झाली होती. अनेक घरांच्या भिंतींची पडझड झाल्याने व सर्वत्र पावसामुळे प्रचंड चिखल झाल्याने या भागातील अनेक कुटुंबीयांवर मोठे आस्मानी संकट कोसळले असून येथील नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.
सतत होणाऱ्या पावसामुळे तसेच कोरोना महामारीच्या संकटाने बेरोजगार झालेल्या हतबल कुटुंबियांवर दुबार आकस्मिक संकट कोसळल्याने या भागातील पिडीत कुटुंबांचे प्रचंड हाल झाले, परंतु या संकटसमयी योग्य समयसूचकता दाखवत भुसावळ शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश रणदिवे यांच्या मदतीने पीडित कुटुंबांना तात्काळ अन्नधान्याची मदत करण्यात आली. यात गहू, तांदूळ, तूरडाळ, साखर, चहापत्ती, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. वेळेवर झालेल्या या मदतीमुळे पीडित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश रणदिवे यांच्या दातृत्वाचे सर्व समाजच स्तरातून कौतुक केले जात आहे.
राहुल नगर भागातील पीडित कुटुंबीयांच्या समस्येकडे आतातरी भुसावळ नगरपरिषदेने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश रणदिवे यांनी केली आहे.याप्रसंगी सागर रणदिवे, संजय लोणारी, सागर ठाकरे, गोलू रणदिवे, धुपेश्वर चांदेकर, सुमित भोई यांच्यासह अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.