जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कृषिकर्जाची वसूली यंदा लक्षणीय प्रमाणात झालीय. संपणाऱ्या आर्थिक वर्षातील यंदाच्या वसुलीने या पूर्वीचे कर्ज वसुलीचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
वास्तविक गेल्या खरीप हंगामात कोणत्याही पिकाचे अपेक्षित उत्पादन झालेले नव्हते. कापसाचे उत्पादन सरासरीपेक्षा 40 टक्क्यांनी घटले, इतर खरीप पिकांचीही तीच अवस्था होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी केलेली कर्जफेड विलक्षण म्हणावी लागेल. सरलेल्या 31 मार्च 2022 ची वसुलीची जी आकडेवारी समोर आली आहे, ती जिल्हा बँकेच्या आर्थिक सक्षमतेची दिशादर्शक ठरावी. हा चमत्कार नसून शेतकऱ्यांनी बँकेच्या विद्यमान नेतृत्वावर व त्यांच्या कार्यतत्परतेला दिलेला सक्रिय प्रतिसाद म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
जिल्हा बँकेवर नवीन संचालक मंडळ गेल्या डिसेंबरमध्ये निवडून आले, या संचालक मंडळाने अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करून, बँकेची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली. या संस्थेवरील दीर्घकाळाचा अनुभव म्हणून देवकरअप्पा यांनीही बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी कामकाजाचा परिणामकारक अजेंडा तयार करून लगेचच कामाला सुरुवात केली. अवघ्या दीड दोन महिन्यातील प्रयत्नातून अपेक्षेपेक्षा अधिक परिणाम साधला गेला आहे. सुमारे एक हजार कोटींचे कृषिकर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी 550 कोटीचे टारगेट त्यांनी निश्चित केले होते. मात्र प्रत्यक्षात सुमारे 650 कोटीची कर्ज वसुली झाली आहे. वसुलीचे टारगेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी तालुकानिहाय विविध कार्यकारी संस्थेचे पदाधिकारी, गट सचिव यांच्या बैठका घेत त्यांना वसुलीबाबत मार्गदर्शन केले, ठिकठिकाणी वसुली मेळावे घेऊन शेतकऱ्यांना आवाहन केले. देवकरांच्या कार्यतत्परतेचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला. बँकेची प्रशासकीय यंत्रणा, प्रमुख अधिकारी वर्गानेही प्रयत्नांना वेग दिला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदाची वसुली दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या वर्षी कृषी कर्जाची एकूण वसूली 422 कोटींची झाली. त्यात 150 कोटी कर्जमाफी योजनेतून बँकेला मिळाले. म्हणजे प्रत्यक्षात 272 कोटीचीच वसुली झाली होती. तथापि सरलेले आर्थिक वर्ष हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल होते. केळी, ऊस, सोयाबीन आदी नगदी पिकांना बाजारात अपेक्षित भाव नव्हते, विषम हवामानामुळे उत्पादकता घटली होती. अशा परिस्थितीत ही कृषी कर्जाची जिल्हा बँकेची झालेली वसुली श्री देवकरअप्पा यांच्या नेतृत्वाची फलश्रुती म्हणता येईल.
लक्षवेधी बाबी
–एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केली कृषी कर्जाची परतफेड… 450 कोटी
— 20 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी केली थकबाकीची परतफेड सुमारे 200 कोटी
–जिल्ह्यातील एकूण कार्यरत विविध कार्यकारी संस्थांपैकी 160 संस्थाचा 100 टक्के वसूल…
सुरेश उज्जैनवाल
ज्येष्ठ पत्रकार जळगाव
मो.8888889014