भुसावळ (प्रतिनिधी) कोरोनाची पहिली लाट आम्ही यशस्वीपणे थोपविण्यासाठी सहकार्य केले पण आमच्या व्यथा कोण मांडणार? अशी भावनिक साद घालत राज्यातील बी.ए.एम.एस.डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्रींसह सर्व संबंधितांना खुले पत्र लिहिले होते. आता त्यांच्या या मागणीला केंद्राचीही साथ मिळाल्याने लवकरच काही निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या पत्राची व बी.ए.एम.एस. डॉक्टरांच्या मागणीची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र संयोजक डॉ. अजित गोपछडे यांनी याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना केला असून राज्यातील या बी.ए.एम.एस. डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेतले जावे, अशी विनंती केली आहे.
राज्यात बी.ए.एम.एस. पदवी धारक डॉक्टरांना जून २०१९ मध्ये शासनाने स्थायी पद देऊन सेवेत समाविष्ट केले होते. त्यामूळे राज्यात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त झाली होती. त्यावेळी एम.बी.बी.एस. पदवी धारक मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. तेव्हा गट-अ पदावर बी.ए.एम.एस.पदवी धारकांची कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली व मार्च २०२० मध्ये या सर्वांनी कोरोना प्रतिबंध कार्यात झोकून दिले होते. म्हणून या डॉक्टरांना कायम सेवेत सामावून घेतले जावे ही मागणी डॉ. नि. तु. पाटील यांनी राज्य शासनाकडे केली होती. आता त्यांच्या या मागणीला केंद्राचीही साथ मिळाल्याने लवकरच काही निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
















