भंडारा (वृत्तसंस्था) शहरातील कीर्ती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषधी दुकान सुरु करण्याचा परवाना मंजूर केल्याने मोबदला म्हणून १५ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या भंडारा शहरातील अन्न व औषध पुरवठा विभागातील औषध निरीक्षकाला मंगळवारी (ता. १३) रात्री उशिरा रंगेहात अटक करण्यात आली आहे. प्रशांत रामटेके (४६) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार डॉक्टर असून आपल्या नातेवाईकाच्या नावाने शहरातील एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषधीचे दुकान (फार्मसी) सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अर्ज दिला होता. फार्मसीच्या त्या परवान्याच्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी न आढल्यामुळे परवाना मंजूर झाला होता. परंतू तरी देखील मोबदला म्हणून २० हजार रुपये द्यावे, अशी मागणी प्रशांत रामटेके याने केली.
यावर तडजोड करून १५ हजार रुपये देण्याचे ठरले. स्वतः आपण कीर्ती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्ये येऊन रक्कम घेऊ असे रामटेकेने सांगितले. यासंदर्भात तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर रात्रीच सापळा रचण्यात आला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रामटेके याने हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्ये येऊन १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारून खिशात टाकताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रकमेसह अटक केली.